सोलापूर : आषाढी वारीमध्ये वारकर्यांची मोठी गर्दी होत असते. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून दहा ड्रोन भाडेतत्तवावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आषाढी वारीतील दहा मानाच्या पालख्यांवर आता ड्रोनची नजर राहणार आहे.आषाढी वारीत विविध जिल्ह्यातून शेकडो पालख्या पंढरपूर येथे दाखल होत असतात. यातील प्रमुख दहा पालख्यांत वारकर्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. वारीसाठी आलेल्या वारकर्यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार्या सोयी-सुविधांची माहिती नसते. त्यामुळे एका विशिष्ट जागीच वारकरी मोठी गर्दी करतात. त्याची माहिती ड्रोनद्वारे घेऊन त्या ठिकाणची गर्दी कमी करता येणार आहे.
प्रमुख पालखी मार्गावर वारकर्यांची संख्या मोठी असते. ती गर्दी नियंत्रित आणण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याने प्रमुख दहा पालख्या मार्गावरील गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा भार हालका होणार आहे. अन्यथा एकाच ठिकाणी मोठी गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते.आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपुरात जवळपास १५ ते २० लाख भाविक दाखल होत असतात. आळंदी व देहू येथून मानाच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात. मजल दरमजल करत ज्ञानोबा-तुकोबांचा गरज करत या पालख्या पंढरीच्या दिशेने येतात. पालख्यांमध्ये असलेल्या वारकर्यांची संख्या मोठी असते. अनेक ठिकाणी मुक्काम करत या पालख्या पंढरीत येतात. त्या पालख्यांमध्ये असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या युक्त्या वापरत असते. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी ड्रोनद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते ड्रोन भाड्याने घेणार आहेत. वारकर्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा हा निर्णय सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.