सैन्याचे वाहन कोसळून १० जवान हुतात्मा

0

डोडा जिल्ह्यातील खन्नी टॉप जवळ झाला अपघात

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज, गुरुवारी लष्कराचे वाहन सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात १० जवानांना हौतात्म्य आले असून १० गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भद्रवाह–चंबा मार्गावरील खन्नी टॉपजवळ घडला. यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराची तुकडी गुरुवारी सकाळी ऑपरेशनल ड्युटीसाठी रवाना झाली होती. खन्नी टॉप परिसरातील दुर्गम भागात तीव्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट खोल दरीत कोसळले. वाहनात एकूण २० जवान होते.अपघाताची माहिती मिळताच लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही मदत व बचावकार्य राबवण्यात आले. घटनास्थळीच १० जवानांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, तर १० जवान जखमी अवस्थेत आढळून आले. जखमी जवानांना प्रथम भद्रवाह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, पुढील उपचारासाठी त्यांना हवाईमार्गे उधमपूर येथील लष्कराच्या कमांड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या दुर्घटनेबद्दल जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर (एक्स) संदेशात म्हंटले की, डोडा येथे घडलेल्या या दुर्दैवी अपघातात देशाने आपले १० शूर जवान गमावले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सेवाभावाचे व सर्वोच्च बलिदानाचे स्मरण सदैव ठेवले जाईल. शोकाकुल कुटुंबीयांप्रती त्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.या दुःखद प्रसंगी संपूर्ण देश शोकसंतप्त कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच जखमी जवानांच्या सर्वोत्तम उपचारांचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech