नवी मुंबई : ऐरोली येथील रात्रीच्या बांधकामादरम्यान गर्डर चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्यामुळे मुंबईच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा शुक्रवारी सकाळपासून अचानक बंद करण्यात आली आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले असून पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ऐरोली आणि रबाळे दरम्यान १० गर्डर बसवण्यासाठी रात्री १ ते ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. मात्र, गर्डर झुकलेले आढळल्याने मोठा सुरक्षेचा धोका निर्माण झाला. परिणामी सकाळी ७:१० वाजल्यापासून ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा स्थगित करण्यात आली. मध्य रेल्वेचे (CR) मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली आहे.
सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. ठाणे आणि ऐरोली दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन पूर्णपणे विस्कळीत झाली असून, प्रवासी पर्यायी मार्गांचा शोध घेताना दिसत आहेत. झुकलेले गर्डर दुरुस्त करण्याचे काम सकाळी ८:१५ वाजता सुरू झाले असून एक तासात काम पूर्ण होईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, अद्यापही एमएमआरडीए कडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी झालेले नाही. त्यामुळे लोकल सेवा केव्हा पूर्ववत होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.