ठाणे : मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील पाच वर्षांत ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी करत यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू, असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. ठाण्यातील शिवाई नगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते.या प्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेरबहादूर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजयुमोचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्व. अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे २७ वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्यसंस्कृती, शेतीउत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली.
मंत्री नितेश राणे म्हणाले, “वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो आहे. कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिले आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे. आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा. मी स्वतःही आयुक्तांशी बोलेन.” असे स्पष्ट करून ना. राणे यांनी कोकणातील आंबा, काजू आदी शेतीउत्पादनांना शहरांत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याचे आवाहन केले. “मुंबईपासून तळ कोकणापर्यंत चिपळुण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत. कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. मत्स्योद्योग व सागरी क्षेत्रात करिअर करण्यासाठी युवकांना संदेश देताना मंत्री नितेश राणे यांनी, कोकणचा ८७७ कि. मी.चा किनारा आहे. त्यामुळे पर्यटना बरोबरच युवकांनी मत्स्योद्योग, सागरी अर्थकारण आणि बंदरविकास क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
मिरा-भाईंदरसह अन्य शहरांत ‘टीपू सुलतान’ नावाने ओळखले जाणारे चौक असल्याचे मंत्री नितेश राणे यांना विचारले असता त्यांनी जहाल भूमिका स्पष्ट केली. असे कुठे चौक असेल त्याला उपटून बाजूला टाकू… उपटायला किती वेळ लागतो.टिपू बीपू नावाचे जे काही चौक आहेत ना त्याने पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बांधावे.आमच्या हिंदू राष्ट्रमध्ये कुठले असे चौक आणि असले काही लाड आम्ही सहन करणार नाही. आणि गप्प बसणार देखील नाही. कोणाला टिप्या बिप्याच्या नावावर चौक बनवायचे असतील. त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे, आमच्या इथे जागा नाही. असेही नितेश राणे यांनी बजावले.