कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर सभा संपन्न, भाजपाचा जीव मुंबईत अडकला असल्याची केली टीका
कल्याण : देश स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका झाल्या मात्र ही निवडणूक डोळ्यात अंजन घालणारी, विचार करणारी आहे. तब्बल ६८ उमेदवार बिनविरोध निवडून येणं म्हणजे त्या मतदार संघातील लोकांचा मतदानाचा हक्क मारणे आहे. त्यामुळे भाजपा सरकारने गेल्या १० – १२ वर्षात लोकशाहीचा बाजार मांडला असल्याची टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कल्याणमध्ये केली. कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ६ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उमेश बोरगावकर, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, संकेश भोईर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अल्ताफ शेख, जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, शहर प्रमुख बाळा परब, मनसेचे विनोद केणे, सचिन पोपलाईतकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे, भाजपाचा जीव मुंबईत अडकला आहे. मुंबई ही सर्वांची आई आहे. त्यामुळे तुम्ही या भाजपाच्या नादाला लागून मुंबई भाजपाच्या हाती देऊ नका, अन्यथा पछतावा करावा लागेल असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. तर गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडलेल्या कोकण वसाहतीला येणाऱ्या अधिवेशनात न्याय मिळवुन देऊ असे आश्वासन देखील दिले. १५ तारखेला तुमच्या निष्ठेची परीक्षा आहे. बलाढ्य शक्ती समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. आधीच्या निवडणुका विचारांचे आदान प्रदान करून लढविल्या जात होत्या. १५ टक्के मतदार कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो. योग्य उमेदवाराला मतदान करत असतात. यातून उमेदवार निवडून येतो.
लोकांचे विचार मारून टाकण्याचे काम यांनी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हा मतदानाची खूप मोठी ताकद दिली. एका मताने उमेदवार निवडण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली होती तो हक्क या लोकांनी मारून टाकला. त्यामुळे यांची सत्ता नागरिक उलथवून टाकल्या शिवाय राहणार नाही. निवडणुका आशा बिनविरोध झाल्या तर जो जास्त पैसे वाटेल हा विचार बळावला तर समाजात अराजकता माजेल.
आठ वेळा मी निवडून आलो मात्र मत विकत घेण्यासाठी एकही रुपया दिला नाही. असाच पैसा वाटण्याचा बाजार सुरू राहीला तर योग्य वेळी थांबलेलं बरं. ज्याअर्थी हे एवढा पैसा वाटत आहे त्याअर्थी हा चोरीचा पैसा असून भ्रष्टाचाराचा पैसा आहे. राज्याच्या तिजोरीतून पैसा काढून वाटायचा आणि मतं विकत घ्यायचे. निवडणुकीच्या तीन महिने आधी कोणतीही आर्थिक लाभाची योजना आणता येत नाही मात्र तरीही त्यांनी आणली. याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत असून निवडणूक अयोग कोणत्या तरी पक्षाचा गडी झालाय. पुन्हा एकदा टी. एन. शेषन आले पाहिजेत. राज्याच्या तिजोरीचे पैसे वाटायचे आणि मतं विकत घाययचे हा घातक पायंडा पडत आहे हे धोक्याचे असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.