– नितीन सावंत
अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्या ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. त्यांचाही जन्म धाराशिव मधील राजकीय घराण्यातच झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या त्या कनिष्ठ भगिनी. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे विश्वासू साथीदार. शरद पवार दिल्लीत संरक्षण मंत्रीपदी गेल्यानंतर सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात डॉ. पाटील हे कॅबिनेटमंत्री होते. 1992 च्या मुंबईतील जातीय दंगली नंतर सुधाकर राव लाईक हे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार होणार हे निश्चित होते. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी डॉ. पाटील यांचे नाव आघाडीवर होते. जवळजवळ तेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले होते. परंतु दिल्लीतील पवार विरोधकांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी डॉ. पाटील यांच्या नावाला विरोध केला. दिल्लीतील पवार विरोधकांनी एक वेगळी खेळी करून शरद पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले. जातीय दंगली नंतर पवारच महाराष्ट्र सावरू शकतात असे सांगून पवारांना पुन्हा महाराष्ट्रात धाडण्यात आले. त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांना गृहमंत्री पद देण्यात आले.
1998 साली काँग्रेसच्या फुटी नंतर डॉ. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिले. त्यानंतर ते 2004 पर्यंत कॅबिनेट मंत्री होते. 2009 साली त्यांनी तत्कालीन उस्मानाबाद म्हणजेच आताच्या धाराशिव मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. तेरणा साखर कारखाना घोटाळा आणि आपले चुलत बंधू पवन राजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप डॉ. पाटील यांच्यावर झाला. या आरोपानंतर कोर्टाच्या लढाईत डॉ. पाटील हतबल झाले. त्या पूर्वी राज्याच्या राजकारणात त्यांचे पुत्र राणा जगजीत पाटील यांचा प्रवेश झाला. पुढे ते राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोट्यातून कृषी राज्यमंत्री होते. परंतु पुढे राजकीय परिस्थितीमुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. राणा पाटील सध्या तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवा नंतर आता अर्चना पाटील धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.
नियतीचा फेरा काही वेगळच असतो. बारामती मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत त्या एक नवख्या खासदार होत्या. परंतु अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्यावर थेट उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यांनी अजितदादांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी घेतलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेमुळे वाद प्रतिवाद खूप झाले परंतु त्यावर त्यांनी भाष्य न करता आपण एक मुरब्बी राजकारणी आहोत हे दाखवून दिले आहे. भविष्यात ते त्या आपल्या कामातून दाखवून देतील याबद्दल शंका नाही.
2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ आमदार निवडून आले होते आणि काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी खरंतर अजित दादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती. परंतु पवारांनी राज्यात तीन मंत्री पदे वाढवून घेतली आणि केंद्रात प्रफुल्ल पटेल यांना नागरी विभाग वाहतूक खात्याचा स्वतंत्र कार्यभार दिला. आज तेच प्रफुल पटेल कुठे आहेत? याचा विचार पवार करत असतील. आपल्या राजकीय वारसदार या सुप्रिया सुळे असतील हे पवारांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळेच जुलै 2023 मध्ये अजितदादा पवार यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
जिल्हा परिषद निवडणुकीत काही जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार होते. परंतु त्यापूर्वीच अजित दादांचे अपघाती निधन झाल्याने या विलीनीकरणाला वेगळेच वळण लागले.
अजित दादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर शरद पवार यांच्या मर्जीनुसार निर्णय झाले असते. या पक्षात सुप्रिया सुळे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले असते. परंतु आता विलीनीकरण झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मर्जीनुसार निर्णय होणार आहेत. त्यामुळे थोरल्या पवारांची थोडीशी पंचाइत झाली आहे.
थोडक्यात भाजपच्या मनासारखे होणार आहे. आपला पक्ष मोठा होताना उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आधी नेत्यांची सद्दी भाजपला संपवायची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भाजपने निवडणुकीत हरवले असेल परंतु राज्यातील या दोन बंधूंची सद्दी संपलेली नाही. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईत आपल्या पक्षाचे विलीनीकरण अजित दादा पवार यांच्या पक्षात केले तर त्यांची सद्दी संपण्यास वेळ लागणार नाही.

– नितीन सावंत, 9820355612