राज्याच्या पोलिस महासंचालकांना मुंबईत ‘गार्ड ऑफ ऑनर’ने मानवंदना

0

मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला तब्बल ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज, शनिवारी सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना देण्यात आली. १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा सदानंद दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रश्मी शुक्ला यांनी सर्वांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, गेली दोन वर्षे महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे.

या काळात राज्यातील सण-उत्सव शांततेत पार पडले आणि निवडणुकाही विनाअडथळा पार पडल्या. विशेषतः गडचिरोली आणि गोंदियातील नक्षलग्रस्त भागांत झालेली सुधारणा आणि नक्षलवाद्यांच्या संख्येत झालेली घट, हे संपूर्ण पोलिस दलाचे यश आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला खूप काही दिले आणि मी खूप काही शिकले आहे. महाराष्ट्र पोलिसांना नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एका टीमसारखे काम केले. मी खूप समाधानी आहे. सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करताना म्हटले की, राज्याची कायदा-सुव्यवस्था राखण्यात रश्मी शुक्ला यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. प्रशासकीय सेवेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव राज्यासाठी मोलाचा ठरला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech