मुंबई : दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर या दरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्ग ९ प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या प्रकल्पात झालेली तीन वर्षांची विलंब व दुसरा टप्पा अद्यापही अनिश्चित अवस्थेत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या प्रकल्पासाठी ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला होता. सुरुवातीला पूर्ण होण्याची अंतिम मुदत ८ सप्टेंबर २०२२ अशी होती, परंतु विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे कामात विलंब झाला आणि आता ही अंतिम मुदत जून २०२५ अशी ठरवण्यात आली होती.
विलंब लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने हा प्रकल्प दोन टप्प्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे: पहिला टप्पा: दहिसर (पूर्व) ते काशीगाव या ४.९७३ किमी अंतरावर मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा: काशीगाव ते मीरा-भाईंदर या उर्वरित मार्गाचे (एकूण लांबी १३.५ किमी) काम अद्यापही सुरू असून, त्याच्या पूर्णत्वाची तारीख स्पष्ट नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) अर्ज करून ही बाब उघड केल्यानंतर प्रशासनाने प्रकल्पात गांभीर्य दाखवत कामाला गती दिली. अनिल गलगली म्हणाले, “तीन वर्षांच्या विलंबानंतरही दुसरा टप्पा अनिश्चित अवस्थेत आहे, व त्याच्या सुरूवातीस आणखी वेळ लागू शकतो.” मेट्रो मार्ग ९ सुरू झाल्यास मीरा-भाईंदर ते मुंबई दरम्यान प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल व दैनिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.