महायुतीच्या वचननाम्यात मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस

0

लाडक्या बहिणी, झोपडपट्टीमुक्त मुंबई, रोहिंग्या-बांगलादेशी मुक्त मुंबई, धारावीचा विकास केंद्रस्थानी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने (भाजपा-शिवसेना-रिपाइं) यांनी आपला संयुक्त वचननामा जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, 20 ते 35 लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी प्रमुख घोषणांचा समावेश आहे. “मुंबईचा सर्वांगीण विकास आणि मराठी संस्कृतीचे रक्षण”, असे या वचननाम्याचे ब्रीदवाक्य आहे.

वचननाम्यातील मुख्य घोषणा
३५ लाख घरांची निर्मिती : मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा शहरात आणण्यासाठी पुढील ५ वर्षांत ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पागडीमुक्त मुंबई : मुंबईतील जुन्या इमारतींमधील ‘पागडी’ पद्धत बंद करून भाडेकरूंना मालकी हक्काची घरे मिळवून दिली जातील.
२० हजार इमारतींना OC : विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (OC) रखडलेल्या २० हजार इमारतींना तात्काळ OC वितरित केले जाईल.

सफाई कामगार आणि पोलिसांसाठी घरे: सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि पोलिसांच्या जीर्ण घरांच्या पुनर्विकासाला प्राधान्य दिले जाईल.

खड्डेमुक्त मुंबई : ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे (CC) केले जातील. रस्ते वारंवार खणले जाऊ नयेत म्हणून १७ नागरी सेवांसाठी ‘यूटिलिटी टनेल’ (Utility Tunnel) बनवण्यात येतील.

महिलांना बस प्रवासात सवलत : ‘बेस्ट’ बसच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाईल.

बेस्टचा विस्तार : २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १०,००० इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील.

पाणीपट्टी वाढीला स्थगिती : दरवर्षी होणारी ८ टक्के पाणी दरवाढ पुढील ५ वर्षांसाठी स्थगित केली जाईल.

मोफत आरोग्य तपासणी : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयांत वर्षातून एकदा मोफत फुल बॉडी चेकअपची सुविधा मिळेल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : प्रत्येक वॉर्डमध्ये ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या आणि औषधे मोफत देणारी केंद्रे पूर्णपणे कार्यक्षम केली जातील.

पूरमुक्त मुंबई : आयआयटी (IIT) सारख्या संस्थांच्या मदतीने जपानी तंत्रज्ञान वापरून मुंबईला ५ वर्षांत पूर्णपणे पूरमुक्त (Flood-free) करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मागेल त्याला शौचालय : झोपडपट्टी भागात स्वच्छता सुधारण्यासाठी ‘मागेल त्याला शौचालय’ हे धोरण राबवले जाईल.

बांगलादेशी व रोहिंग्या मुक्त अभियान: मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बाहेर काढून मुंबई पूर्णपणे घुसखोरमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

भ्रष्टाचारमुक्त पालिकेसाठी AI तंत्रज्ञान : महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

कंत्राटदारांचे सक्तीचे पडताळणी: पालिकेच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी मुंबईतील सर्व कंत्राटदारांचे कडक पोलीस व्हेरीफिकेशन आणि कामाची पडताळणी अनिवार्य केली जाणार आहे.

मराठी अस्मिता आणि भाषा विभाग: महानगरपालिकेत स्वतंत्र ‘मराठी भाषा विभाग’ स्थापन केला जाईल. तसेच मराठी तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विशेष ‘नवे धोरण’ राबवून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना जोडून ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ’ उभारण्यात येईल, ज्याद्वारे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्यात येतील.

हुतात्मा स्मारकात जागतिक दर्जाचे संग्रहालय: संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हुतात्मा स्मारक चौकात एक जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारले जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech