लोकसभेत पंतप्रधानांचे भाषण न झाल्याने तीव्र प्रतिक्रिया

0

नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होऊ न शकल्याने बुधवारी संसदेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या घटनेवर सत्ताधारी भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विरोधकांवर सभागृहाचे कामकाज जाणीवपूर्वक अडवण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, सभागृहातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी स्वतः पंतप्रधान मोदी यांना त्या वेळी सभागृहात न येण्याची विनंती केली होती.

संपूर्ण देशाने काल सभागृहातील परिस्थिती पाहिली. महिला खासदार त्या ठिकाणी जमा झाल्या होत्या जिथे पंतप्रधान बसतात. परिस्थिती अनिश्चित होती आणि पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता असे त्यांनी स्पष्ट केले. ही घटना संसदेच्या प्रतिष्ठेला साजेशी नसल्याचे नमूद करत ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांनी त्यांच्या विनंतीचा मान ठेवल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सभागृहात पोस्टर घेऊन येत कामकाज अडवले गेले, तर संसद सुरळीत चालू शकत नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. काही सदस्यांनी बुधवारी केलेले वर्तन अयोग्य असल्याची टीका ओम बिर्ला यांनी केली. तसेच अध्यक्षांच्या कार्यालयात घडलेली घटना ही संसदीय परंपरेवरील ‘काळा डाग’ असल्याचे ते म्हणाले. सभागृह सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, भाजप खासदार कंगना राणावत यांनी विरोधकांवर थेट आरोप केले. पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी सज्ज होते; मात्र त्याआधीच काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांचा मार्ग पूर्णपणे अडवला, असा दावा त्यांनी केला. काही विरोधी खासदारांनी लोकसभा अध्यक्षांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षातील महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ जमा झाल्या होत्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech