रत्नागिरी : क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स (CCTNS) अंतर्गत सन २०२५ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून गुन्हे उघडकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यांतून २१ कोटी ३८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जिल्ह्यात हस्तगत करण्यात आला आहे. खून, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत या गुन्ह्यांमध्ये २०२५ साली १०० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात आले. तसेच दरोडा, चोरी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण २०२४ मधील ४५ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ६६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
जिल्ह्यात वाहनचोरीच्या ३९ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी २० गुन्हे उघड झाले आहेत. महिलांविरोधातील गुन्हे व फसवणूक प्रकरणांमध्ये २०२४ च्या तुलनेत घट झाली असून फसवणूक गुन्ह्यांमध्ये सुमारे ३३ टक्क्यांची कमी नोंदवली आहे. अवैध दारू, जुगार व अमली पदार्थविरोधी कारवाईतही रत्नागिरी पोलीस दलाने प्रभावी कामगिरी केली आहे. एनडीपीएस कायद्यान्वये २०२५ मध्ये ७५ कारवाया करण्यात आल्या. सायबर गुन्ह्यांतून २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम पीडितांना परत मिळवून देण्यात आली आहे. बेपत्ता व अपहरण प्रकरणांमध्येही समाधानकारक यश मिळाले असून बहुसंख्य व्यक्ती व सर्व मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तडीपारीची कारवाई, शस्त्र परवाने, पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणांची निर्गती वेळेत करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.