ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित

0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीझर प्रसिद्ध झाला असून या टीझरमधील वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ८ आणि ९ जानेवारीला ही मुलाखत प्रकाशित होणार आहे. टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असावे, सत्तेवर नसावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तर मुंबईतील समस्यांची खरी समज मुंबईत जन्माला आलेल्यांनाच होऊ शकते, असे राज ठाकरे म्हणताना दिसतात. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला २० वर्षे वाट का पाहावी लागली, असा प्रश्नही मुलाखतीत विचारला असल्याचे टीझरमध्ये दिसते.

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे खटाटोप सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला असून भ्रष्टाचाराच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करु नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीत मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांवर थेट प्रश्न उपस्थित केले. मुंबईकर म्हणून आता घराबाहेर पडताना लाज वाटते, १० मिनिटांच्या अंतरासाठी १ तास लागतो, असे ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी मुंबई खराब व्हायला वेळ लागला, मात्र पुणे लवकरच बरबाद होईल, असा इशारा दिला. निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या ठिकाणी लोक शाई बोटावर कशी दाखवणार, असा सवाल महेश मांजरेकर यांनी उपस्थित केला असता वाटलेल्या नोटांमुळे हे घडले, अशी टीका ठाकरे बंधूंनी केल्याचे टीझरमध्ये दिसते.

दरम्यान, या मुलाखतीवरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे बंधूंची एक्सपायरी डेट जवळ आल्याची टीका केली. ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच असून बाकी संपले आहेत, कार्यकर्ता साथ देत नाही, उमेदवार मिळत नाहीत, असे ते म्हणाले. पालिकेत कसा पैसा खाल्ला याचा हिशोब काढू, असा इशाराही त्यांनी दिला. संजय राऊत कधी लोकांमधून निवडून आलेत का, त्यांनी केलेले एक सामाजिक काम दाखवावे, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. मराठी माणसाला देशोधडीला लावल्याचा आरोप करत आता तो त्यांच्या मागे उभा राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर जाहीर होताच राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ८ आणि ९ जानेवारीला प्रकाशित होणाऱ्या संपूर्ण मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech