मुंबई : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सावरकरांसह अनेक महान क्रांतिकारकांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. राष्ट्रकार्यासाठी जीवन वेचणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय आणि इतर विभूतींच्या अमूल्य योगदानाबाबत देखील इतिहासाने मौन बाळगले, ही दुर्दैवी गोष्ट असून या त्रुटी दूर करून त्यांच्या जीवनकार्याबद्दल नवीन पिढीला अवगत करण्याची योग्य वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाने निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा मंगळवारी (दि. २७) विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
मुंबई विद्यापीठाचे स्नातक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साठाव्या स्मृती वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे विचार व तत्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र निर्माण केल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्वलंत राष्ट्रवादाचे मूर्त रूप होते. देश हाच त्यांच्याकरिता देव होता. सावरकर क्रांतिकारक तर होतेच परंतु ते कवी, विज्ञाननिष्ठ लेखक, इतिहास तज्ज्ञ व आघाडीचे समाज सुधारक होते. जातीभेद व अस्पृश्यतेच्या कुप्रथेचे ते कट्टर विरोधक होते. सावरकरांच्या जीवनातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी याकरिता त्यांच्या जीवनाशी निगडित ठिकाणांचे ‘सावरकर सर्किट’ तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. मराठी भाषा शुद्धीकरणाच्या व विकासात सावरकर यांचे योगदान मोठे होते असे सांगून अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर व्यक्ती नव्हे तर संस्था: मुख्यमंत्री
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्ती नव्हते तर ते संस्था होते. त्यांच्या जीवनाच्या एकेक पैलूवर संशोधन होऊ शकते असे सांगून मुंबई विद्यापीठाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राला निधी अपुरा पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. दोन वेळा जन्मठेप झाली असे सावरकर हे एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमान येथील एकांतवासाची शिक्षा भोगताना अनेक लोक मनोरुग्ण होत. मात्र सावरकर ११ वर्षात कधीही निराश झाले नाही. त्यांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी तेथील काळकोठडीत केवळ ११ तास घालवून दाखवावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
सावरकरांनी जाती उच्छेदनासाठी निबंध लिहिले. जातिप्रथेचा उगम कुठून झाला याचे विश्लेषण केले. जातिप्रथा मोडून काढण्यासाठी त्यांनी पतितपावन मंदिर बांधले, आंतरजातीय विवाहाला चालना दिली असे सांगून सावरकर यांचे सामाजिक समरसतेचे कार्य उल्लेखनीय आहे असे फडणवीस यांनी सांगितले. सावरकर यांच्या भाषाशुद्धी कार्याबद्दल बोलताना फडणवीस यांनी सावरकर यांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द दिले असे सांगितले. बोलपट, चित्रपट, शस्त्रसंधी, विधिमंडळ, निवृत्तीवेतन आदी शब्द सावरकर यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.