राज्यात तर तीन माकडांचे सरकार- बच्चू कडू

0

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक सभेत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन दिले होते. चार महिने झाले, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना कानच राहिलेले नाहीत. त्या तीन माकडांसारखी अवस्था झाली आहे. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे. एकाच्या कानावर हात आहेत. आता कुणाला सांगावे. कोणता भोंगा वाजवावा. ज्यामुळे या तीन माकडांचे तोंड उघडेल, अशी खरमरीत टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी केली.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संताजी धनाजी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, तामिळनाडू सरकारचा अर्थसंकल्प ३ लाख कोटींचा आहे. बच्चू कडू म्हणाले, एकीकडे गडगंज संपत्तीचे प्रदर्शन करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आजूबाजूला दिसतात. रेस्टॉरंट, बिअर बारमध्ये हे कार्यकर्ते बसतात. विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. पण, अशा विपरित परिस्थितीतही आम्ही आमच्या शेतकरी बापाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. छातीवर दगड ठेवावा लागेल. किती इंचाची छाती आहे, हे माहित नाही. पण त्या ५६ इंचाच्या छातीपेक्षा दहा पट मजबूत ही कार्यकर्त्यांची छाती आहे, हे आम्हाला माहीत आहे. बच्चू कडू म्हणाले, शेतकरयांवर अन्याय होत असताना, ते आत्महत्या करीत असताना कुणाला राग येत नाही. राग येण्याची प्रक्रियाच थांबली आहे की काय, असा प्रश्न आम्हाला पडतो. आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हक्काची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. आधी काँग्रेसची राजवट होती, आता भाजपची आहे. २०२२ पर्यंत नरेंद्र मोदी सर्वांना घर देणार होते, त्याचे काय झाले, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech