विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, वैमानिकही अनुभवी, विमान कंपनीच्या संचालकांचा दावा

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर अपघातग्रस्त विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation) या कंपनीचे होते. अपघातानंतर दिल्लीमध्ये मीडियाशी संवाद साधताना कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी सांगितले की, विमान उतरवण्याचा निर्णय पूर्णतः वैमानिकाचा होता. त्यांनी आधी रनवे २९ वर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही तांत्रिक अडचण आली. त्यानंतर रनवे ११ वर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला.

विजय कुमार सिंह स्पष्टपणे म्हणाले, विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. कोणतीही यांत्रिक अडचण आढळलेली नाही. विमानाच्या क्रू बाबत माहिती देताना विजय कुमार सिंह म्हणाले, कॅप्टन सुमित कपूर यांना १६ हजारांहून अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. को-पायलटकडेही सुमारे १५०० तासांचा अनुभव होता. कॅप्टन कपूर यांनी यापूर्वी सहारा एअरलाइन, जेटलाईट आणि जेट एअरवेज सारख्या नामांकित विमान कंपन्यांमध्ये काम केले होते. ते या प्रकारच्या विमानावरही अत्यंत अनुभवी होते.

कॅप्टन सुमित कपूर माझे खूप चांगले मित्र होते; ते मला भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याच कंपनीत पायलट आहे. कॅप्टन शांभवी पाठक माझ्यासाठी मुलीसारख्या होत्या. दोघेही उत्कृष्ट वैमानिक आणि अत्यंत चांगले माणसे होती. दरम्यान, या अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, ब्लॅक बॉक्स व तांत्रिक तपासणीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की, वैमानिकाला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. दृश्यता कमी होती. आम्ही सध्या मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. २०२३ मध्ये झालेल्या अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले, तो अपघात मुंबई विमानतळावर झाला होता. त्यावेळीही पाऊस होता आणि दृश्यता कमी होती. लँडिंगनंतर विमान रनवेवरून घसरले होते. ती वेगळी घटना होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech