राष्ट्रवादीचे पुणेकरांसाठी संयुक्त हमीपत्र – मोफत मेट्रो, मोफत बस, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रियासुळेयांच्याप्रमुखउपस्थितीत “अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची” “पुण्यासाठी हमीपत्र” अशा आशयाने जाहीरनामा सादर करण्यात आला. या जाहीरनाम्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी विविध विकासकामांची योजना मांडण्यात आली आहे. यावेळी खा. अमोल कोल्हे हेही उपस्थित होते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, शहरातील दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर करण्यासाठी मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा उपलब्ध करण्याचे ठरले आहे. याशिवाय, १५० आधुनिक शाळा उभारण्याचेही उद्दिष्ट जाहीर करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मेट्रो आणि बसचा प्रवास विनामूल्य मिळेल. यामुळे कुटुंबांच्या आर्थिक ओझ्यात घट होईल, शाळा आणि नोकरीच्या ठिकाणी जाणे सुलभ होईल. सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळून खासगी वाहनांवरची अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे रस्त्यांवरची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. मेट्रोच्या शेवटच्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी फीडर बस सेवाही मजबूत करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले की, आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोलत आहे. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.