गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन केवळ पूजा-अर्चा केली नाही, तर देशाच्या इतिहासाशी, श्रद्धेशी आणि आत्मसन्मानाशी जोडलेला एक सशक्त संदेशही दिला. सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्ताने बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सोमनाथ उद्ध्वस्त करणारे आक्रमक आज इतिहासाच्या पानांत गडप झाले आहेत; मात्र दुर्दैवाने आजही देशात अशा शक्ती अस्तित्वात आहेत, ज्या मंदिरांच्या पुनर्निर्माणाला विरोध करत आल्या आहेत.
देशभरातील भाविकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले, “आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आपल्याशी जोडले गेले आहेत. हा काळ अद्भुत आहे, हे वातावरणही अद्भुत आहे. एका बाजूला महादेव, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा, मंत्रोच्चारांची गूंज आणि भक्तांची उपस्थिती—हे सर्व या प्रसंगाला दिव्य बनवत आहे.” सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून या ऐतिहासिक पर्वात सेवा करण्याची संधी मिळणे हे आपण आपले सौभाग्य मानतो, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, आज येथे उभे राहून बोलताना त्यांच्या मनात वारंवार हा प्रश्न येतो की, हजार वर्षांपूर्वी याच ठिकाणी वातावरण कसे असेल “आपल्या पूर्वजांनी आपल्या श्रद्धेसाठी आणि महादेवासाठी सर्वस्व अर्पण केले. आक्रमकांना वाटले की त्यांनी विजय मिळवला; पण हजार वर्षांनंतरही सोमनाथाची ध्वजा संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याचा संदेश देत आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की, सोमनाथाचा इतिहास हा विनाशाचा नसून विजय आणि पुनर्निर्माणाचा इतिहास आहे. आक्रमक येत राहिले, पण प्रत्येक युगात सोमनाथ पुन्हा उभा राहिला. इतके धैर्य, संघर्ष आणि पुनर्निर्माणाचे उदाहरण जागतिक इतिहासात दुर्मिळ आहे, असे त्यांनी सांगितले. जे लोक आपल्या धर्माशी प्रामाणिक असतात, ते कधीही कट्टरतावादी विचारसरणीचे समर्थन करत नाहीत, असे सांगून त्यांनी तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांनी अशा विचारांपुढे नेहमीच गुडघे टेकल्याचा आरोप केला. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथाच्या पुनर्निर्माणाचा संकल्प केला तेव्हाही त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले, तसेच १९५१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या मंदिर भेटीवरही आक्षेप घेण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली.
पंतप्रधानांनी इशारा दिला की, आज तलवारींच्या ऐवजी नवे आणि गुप्त मार्ग अवलंबून भारताविरोधात कट रचले जात आहेत. त्यामुळे देशाने सजग, मजबूत आणि एकजूट राहण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सुमारे ३० मिनिटे सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली. त्यांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला, फुले अर्पण केली आणि पंचामृताने अभिषेक केला. त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी पुजारी आणि स्थानिक कलाकारांची भेट घेतली तसेच चेंदा हे वाद्यही वाजवले.यापूर्वी सुमारे एक किलोमीटर लांब शौर्य यात्रेत पंतप्रधान मोदी यांनी डमरू वाजवला आणि वीर हमीरजी गोहिल तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांना नमन केले.