भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात बोलणाऱ्यांना २०० वेळा रोखू; श्रीकांत शिंदे यांचा राहुल गांधींना इशारा

0

नवी दिल्ली : भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केल्यास आमच्याकडून २० वेळा नाही तर २०० वेळा रोखलं जाईल, असा इशारा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला. लोकसभा अध्यक्षांविरोधात इंडि आघाडीने आणलेल्या अविश्वास ठरावाला खासदार डॉ. शिंदे यांनी विरोध केला आणि शिवसेनेची रोखठोक भूमिका सभागृहात मांडली. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, गौरव गोगई यांनी विरोधी पक्ष नेत्याला भाषण करताना २० वेळा रोखण्यात आलं असा आरोप केला. मात्र देशाच्या विरोधात आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केली तर २० वेळा नाही तर २०० वेळा आमच्याकडून रोखलं जाईल, असा इशारा खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना दिला. संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेसची निती देशविरोधी राहिली आहे, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हवाई दलाने आणि लष्कराने शौर्य दाखवलं. मात्र याबाबत गर्व न बाळगता पाकिस्तानने भारताचे किती विमाने पाडली, हे जगाला सांगण्यामध्ये काँग्रेस नेते आघाडीवर होते. परदेशात जाऊन भारताची बदनामी करायची ही राहुल गांधी यांनी निती आहे. त्यांचे भारताविरोधी विचार पाकिस्तानात दाखवले जातात, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. विरोधी पक्ष नेते नेहमीच सभागृहात गैरहजर असतात. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी कोणत्याही समस्येबाबत तोंड उघडलं नाही. शून्य प्रहरात त्यांनी कधी आपलं म्हणणे मांडले नाही. त्यांच्या २२ वर्षांच्या कार्यकाळात एकही खासगी विधेयक त्यांनी सभागृहात सादर केले नाही. आजही इतक्या महत्वाच्या विषयावर विरोधी पक्ष नेते सभागृहात नाहीत. स्वत:च्या सरकारने केलेली विधेयकं जाहिररित्या फाडण्याचे काम ज्यांनी केले तेच आज संसद आणि लोकशाही वाचवण्याचा कांगावा करत आहेत, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी राहुल गांधींवर केली.

२००९ ते २०१४ या काळात गांधी फक्त दोन वेळा सभागृहात बोलले. मात्र २०१४ पासून २०१९ या काळात ते १४ वेळा बोलले, २०१९ ते २०२४ या काळात ८ वेळा आणि २०२४ ते २०२६ या काळात गांधी १४ वेळा सभागृहात बोलण्याची संधी मिळाली. १५ वी, १६ वी आणि १७ व्या लोकसभेत गांधी यांची ५० टक्क्यांहून जास्त अनुपस्थिती होती. निम्म्याहून जास्त काळ सभागृहात गैरहजर राहणारे अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव कसा काय आणू शकतात, असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने पहलगाममध्ये हल्ला केला तेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. मात्र विरोधी पक्ष नेत्याने लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, जगातील २६ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरवले आहे. पंतप्रधानांनी भूटानपासून इस्त्राईलपर्यंत १९ देशांमध्ये जाऊन संबोधित केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांना जगभरातून इतका सन्मान मिळाला आहे, असे ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech