नवी दिल्ली : पुण्यातील बहुचर्चित पोर्श कार अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत आरोपी आदित्य अविनाश सूद याला नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील एकूण १० आरोपींपैकी आदित्य सूद हा प्रमुख आरोपी होता. त्याचप्रमाणे न्यायालयाने आशीष मित्तल आणि अमर गायकवाड यांनाही जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी गेल्या १८ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपी आदित्य सूद यांच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रशांत पाटील आणि वकील आबिद मुलाणी न्यायालयात उपस्थित होते. जामिनाच्या निर्णयाची माहिती देताना प्रशांत पाटील यांनी सांगितले की, न्यायालयाने काही अटींसह दिलासा दिला आहे. त्यानुसार, आरोपी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करेल आणि पुराव्याशी कोणत्याही प्रकारे छेडछाड केली जाणार नाही.
दरम्यान, पुणे पोर्श अपघात प्रकरणावर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सण-उत्सव साजरे करण्याचा अर्थ वेगाने वाहन चालवून फुटपाथवरील लोकांना किंवा गरीबांना चिरडणे असा होत नाही. अशा घटना पहिल्यांदाच घडत नाहीत, त्यामुळे कायद्याला अधिक कडक बनवण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी यामध्ये पालकांची जबाबदारी सर्वाधिक असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, पालक मुलांना ऐश करण्यासाठी पैसे देतात, पण त्यांच्याशी बोलण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी वेळ काढत नाहीत. परिणामी, ही पोकळी ते पैसे किंवा एटीएम कार्ड देऊन भरून काढतात.
न्यायालयाने नमूद केले की, अशा परिस्थितीत मुले मोबाईल फोनच्या आधारे मनमानी फिरत राहतात. मात्र, आजच्या सुनावणीत अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्तनमुने बदलल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. आरोपी १८ महिन्यांपासून तुरुंगात असल्याने जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जामिनाच्या अटी खालचे न्यायालय ठरवेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
ही घटना १९ मे २०२४ रोजी रात्री पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली होती. कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलाने चालवलेल्या पोर्शे कारने दोन आयटी व्यावसायिकांना चिरडले होते, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.या प्रकरणी ५२ वर्षीय आदित्य अविनाश सूद आणि ३७ वर्षीय आशीष सतीश मित्तल यांना गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेल्या मुख्य अल्पवयीन आरोपीसोबत असलेल्या दोन अन्य अल्पवयीन मुलांचे रक्तनमुने अदलाबदल करून तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.