कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सीमेजवळ पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवर बांगलादेशातील युवा नेता आणि सामाजिक कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. माहितीनुसार हे दोघे आरोपी भारतात लपून बसले होते आणि संधी मिळताच पुन्हा बांगलादेशात पळून जाण्याची योजना आखत होते. पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बोंगाव सीमा भागाजवळ छापा टाकून दोन्ही आरोपींना पकडले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की बांगलादेशात गंभीर गुन्हा करून दोन जण बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले आहेत. त्यानंतर स्पेशल टास्क फोर्सने बोंगाव परिसरात छापेमारी केली. ७ आणि ८ मार्चच्या रात्री दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख राहुल उर्फ फैसल करीम मसूद आणि आलमगीर हुसेन अशी झाली आहे. या दोघांवर बांगलादेशात हत्या आणि खंडणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की दोन्ही आरोपी मेघालय सीमेमार्गे बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिले आणि शेवटी पश्चिम बंगालमधील बोंगाव भागात पोहोचले. संधी मिळाल्यास पुन्हा बांगलादेशाची सीमा ओलांडण्याचा त्यांचा उद्देश होता. पोलिसांना संशय आहे की ते काही काळ सीमा भागात लपून राहण्याची योजना आखत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. तपास यंत्रणा आता या हत्येच्या कटात आणखी कोण-कोण सहभागी होते याचा शोध घेत आहेत. तसेच भारतात आल्यानंतर आरोपींनी कोणत्या व्यक्तींशी संपर्क साधला याचीही चौकशी सुरू आहे.
माहितीनुसार १२ डिसेंबर रोजी ढाका येथील बिजयनगर परिसरात शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी ते रिक्शाने प्रवास करत होते. हल्लेखोरांनी जवळून गोळी झाडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.यानंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी १५ डिसेंबर रोजी एअर ऍम्ब्युलन्सद्वारे सिंगापूरला पाठवण्यात आले. मात्र १८ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. त्यांच्या समर्थकांनी न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.उस्मान हादी यांना फेब्रुवारी २०२६ मधील राष्ट्रीय निवडणुकीत ढाका-८ मतदारसंघातून संभाव्य उमेदवार मानले जात होते.