श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याच्या डोंगराळ आणि जंगलातील भागात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झाली. ही कारवाई बुधवारसुद्धा सुरू राहिली, या दरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य आणि सीआरपीएफने उधमपूरच्या बंसंतगड भागात झालेल्या संयुक्त चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. मंगळवारी सुरक्षा दलांना जिल्ह्याच्या रामनगर आणि बंसंतगड दरम्यानच्या उंच आणि दुर्गम भाग चिगला बलोट्यात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. त्यानंतर सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या विस्तृत शोधमोहीम सुरू केली.सुरक्षा दल पुढे जात असताना दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जगरेडा परिसरातील घनदाट जंगलात लपलेले दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.
यानंतर संपूर्ण भागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आणि अतिरिक्त सुरक्षा दलांना घटनास्थळी बोलावण्यात आले. रात्रीपर्यंत दोन्ही बाजूंच्या गोळीबाराच्या बातम्या आल्या. पोलीस आणि सेनाधिकार्यांनीही घटनास्थळी पोहोचून संपूर्ण ऑपरेशनचे निरीक्षण केले. दरम्यान, सैन्याच्या व्हाइट नाइट कोरने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारावर चालवण्यात येणाऱ्या या संयुक्त मोहिमेला “ऑपरेशन केया” असे नाव देण्यात आले आहे. दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यामुळे आधीपासूनच उधमपूर जिल्ह्याच्या डोंगराळ आणि जंगल भागात शोधमोहीम सुरू होती.