मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले असताना लँडिंगवेळी अजितदादांचे विमान कोसळून ही दुर्घटना घडली. यामध्ये अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांवर शोककळा पसरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला.
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे तर आदित्य ठाकरेंनी म्हटले की, अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत.
दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली.