गुगल मॅप्सवर दिसणार अधिकृत आधार केंद्रे

0

यूआयडीएआय आणि गुगल यांची भागीदारी

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना आधार सेवांचा अधिक सोपा आणि विश्वासार्ह लाभ मिळावा यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आणि गूगल यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आली आहे. या सहकार्याअंतर्गत लवकरच गुगल मॅप्स वर अधिकृत आधार केंद्रांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातील प्रमाणित आधार केंद्र शोधणे अधिक सुलभ होईल.

या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्या केंद्रात कोणत्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात याची स्पष्ट माहिती मिळणार आहे. प्रौढांचे नवीन आधार नोंदणी, लहान मुलांचे एनरोलमेंट, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक अपडेट यांसारख्या सेवांच्या आधारे केंद्रांची ओळख पटवता येणार आहे. तसेच संबंधित केंद्राचे कामकाजाचे वेळापत्रक, पार्किंगची सुविधा, दिव्यांगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का याची माहितीही नकाशावर दिसणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून गैरसमज किंवा चुकीची माहिती टाळता येणार आहे.

सध्या देशभरात नव्या युगातील आधार सेवा केंद्रांसह ६० हजारांहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांची पडताळणी केलेली माहिती गुगल मॅप्स वर उपलब्ध करून देण्याचा यूआयडीएआयचा मानस आहे. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी सांगितले की, आधारधारकांचे जीवन अधिक सुलभ करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असून या भागीदारीमुळे अधिकृत केंद्रांपर्यंत पोहोचणे जलद, सोपे आणि पारदर्शक होईल.

या सहकार्याच्या पुढील टप्प्यात यूआयडीएआय गूगल बिझनेस प्रोफाइलचा वापर करून केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवणार असून नागरिकांच्या अभिप्रायांना थेट प्रतिसाद देणार आहे. भविष्यात गुगल मॅप्स द्वारे थेट अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधाही उपलब्ध करण्याचा विचार आहे. गूगल इंडियाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्रमुख रोली अग्रवाल यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे लाखो लोकांना विश्वासार्ह सरकारी सेवा शोधणे अधिक सोपे होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech