नवी दिल्ली : माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्तीस अधिकृत मान्यता दिली आहे. २९ एप्रिल रोजी प्रीती सुदान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यूपीएससी अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे.
कोण आहेत अजय कुमार ? : अजय कुमार हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले केरळ केडरचे आहेत. त्यांनी २३ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात संरक्षण सचिव म्हणून काम पाहिले होते. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) अध्यक्षाची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत केली जाते. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा यूपीएससीच्या कामकाजात निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.