पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना

0

वॉशिंगटन : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. गुरुवारी(दि. ८) रात्रीपासून पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला सुरु केला आहे.या हल्ल्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले आहे.याडदरम्यान, आता अमेरिकेने अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकन वाणिज्य दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केली आहे. अमेरिकन नागरिकांनी शक्य तितक्या लवकर लाहोर सोडावे. पंजाब प्रदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठीही हा इशारा जारी करण्यात आला आहे.

अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या सुरक्षा सतर्कतेनुसार, लाहोर आणि आसपासच्या भागात अनेक ड्रोन क्रॅश आणि स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच, हवाई हद्दीच्या संभाव्य उल्लंघनाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.दूतावासाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाहोरच्या मुख्य विमानतळाभोवतीच्या काही भागातून स्थलांतर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, असे सुरक्षा एजन्सींकडून संकेत मिळाले आहेत, असे यामध्ये म्हटले आहे. अमेरिकन दूतावासाने पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांना आवाहन केले आहे की जर ते कोणत्याही संघर्षग्रस्त क्षेत्रात असतील आणि सुरक्षितपणे निघू शकत असतील तर त्यांनी तेथून लवकरात लवकर निघून जावे.

जर निघणे शक्य नसेल तर सुरक्षित ठिकाणी रहा आणि परिस्थिती सामान्य होण्याची वाट पहा. नागरिकांना त्यांचे प्रवास दस्तऐवज अद्ययावत ठेवावेत आणि ते नेहमी सोबत ठेवावेत असा सल्ला देण्यात येत आहे. परिस्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवा. पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावास त्यांच्या विशेष संदेश प्रणालीद्वारे आवश्यक अपडेट्स पाठवत राहतील. अशा परिस्थितीत, सर्व नागरिकांनी त्यांचे नाव स्मार्ट ट्रॅव्हलर एनरोलमेंट प्रोग्राममध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री करावी. अमेरिकन नागरिकांना अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास आणि त्यांचे ओळखपत्र नेहमी सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech