अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून केले घोषित

0

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेला एक विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. बीएलएला माजिद ब्रिगेड म्हणूनही ओळखले जाते, ते गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत एक पत्रही जारी केले आहे. परराष्ट्र विभाग बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या मजीद ब्रिगेडला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करत आहे, असं या पत्रामध्ये म्हटले आहे.

परराष्ट्र विभागाने जाहीर केले आहे की मजीद ब्रिगेडला ‘फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन’ यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. वर्ष २०१९ मध्ये अमेरिकेने बीएलएला ‘स्पेशली डिझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट’ यादीत समाविष्ट केले होते. परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार, २०१९ पासून बीएलए ने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. २०२४ मध्ये बीएलए ने कराची विमानतळ आणि ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्सच्या जवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यांचे दावे केले होते.

परराष्ट्र विभागाने आपल्या निवेदनात ‘जाफर एक्सप्रेस’चा देखील उल्लेख केला आहे. मार्च महिन्यात ज्या जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण झाले होते, त्याची जबाबदारीही बीएलएनेच घेतली होती. ही ट्रेन क्वेटा येथून पेशावरकडे जात होती, तेव्हा तिचे अपहरण करण्यात आले होते. बीएलएने त्या वेळी ३०० प्रवाशांना बंदी बनवले होते. या घटनेत सामान्य नागरिकांसह सुरक्षाकर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ३१ जणांचा मृत्यू झाला होता.

परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे दहशतवादाविरोधातील लढाईतील अमेरिकेची कटिबद्धता स्पष्ट होते. विभागाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या संघटनेला दहशतवादी यादीत समाविष्ट करणे हे दर्शवते की अमेरिका या संकटाविरोधात किती गंभीरपणे काम करत आहे आणि दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या मदतीचा स्रोत कसा बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे की, सोमवार (दि. १२) घेतलेला हा निर्णय ‘इमिग्रेशन अँड नॅशनलिटी ॲक्ट’ च्या सेक्शन २०२९ अंतर्गत घेतला गेला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech