‘राष्ट्र प्रेरणा स्थळ’ ठरेल राष्ट्रीय चेतनेचे केंद्र
लखनऊ : उत्तर प्रदेश हा देशाचा आत्मा असून विकसित भारताच्या संकल्पनेचे प्रमुख इंजिन ठरेल, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त लखनऊ येथे आयोजित ३ दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी जनतेला भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. समाजवादी पार्टी आणि काँग्रेससारख्या कुटुंबवादी व जातीय राजकारण करणाऱ्या पक्षांकडून राज्याचा विकास शक्य नसल्याचे सांगत, विकासासाठी भाजपाच योग्य पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश भयमुक्त झाला असून, कायदा-सुव्यवस्थेत ऐतिहासिक सुधारणा झाल्याचे अमित शहा म्हणाले. रस्ते, वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती झाली असून आज प्रत्येक गावाला सरासरी २० तास वीजपुरवठा होत आहे. राज्यात सर्व नागरिकांशी समान वागणूक दिली जात असून राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’चा संकल्प मांडला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘विकसित उत्तर प्रदेश’साठी काम करत आहेत, असे सांगत अमित शहा म्हणाले की, उत्तर प्रदेश देशाची धडधड आणि आत्मा आहे. त्यामुळे आगामी काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग उत्तर प्रदेश ठरवेल.उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात ‘सरदार पटेल औद्योगिक क्षेत्र योजना’ निर्णायक ठरेल, असा दावा अमित शहा यांनी केला.
याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १०० एकर क्षेत्रात ‘सरदार वल्लभभाई पटेल रोजगार क्षेत्र’ उभारले जाणार असून, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पूर्वी उत्तर प्रदेशला केवळ मजूर पुरवणारे राज्य म्हणून पाहिले जात होते, मात्र आता ते औद्योगिक व आर्थिक विकासाचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले. योगी सरकारच्या कार्यकाळात राज्याचा विकास दर १७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
लखनऊ येथील ‘राष्ट्र प्रेरणा स्थळ’ हे राष्ट्रीय विचार व प्रेरणेचे केंद्र बनेल, असे सांगत अमित शहा यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचा गौरव केला. पूर्वी कचऱ्याचा डोंगर असलेल्या ६५ एकर जागेचे सांस्कृतिक केंद्रात रूपांतर झाल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. या कार्यक्रमात अंतराळवीर विंग कमांडर शुभांशु शुक्ला, ‘फिजिक्स वाला’चे संस्थापक अलख पांडेय, कवी डॉ. हरिओम पवार, शिक्षण व नवोन्मेष क्षेत्रातील रश्मी आर्या आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुधांशू सिंह यांना ‘उत्तर प्रदेश गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवला. उत्तर प्रदेशने नेहमीच देशाला दिशा दिली असून, गेल्या ११ वर्षांत झालेला बदल संपूर्ण देशाने पाहिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मजबूत कायदा-सुव्यवस्था, जलद विकास प्रकल्प आणि उज्ज्वला योजनेसारख्या उपक्रमांमुळे उत्तर प्रदेश नव्या भारताचे उदाहरण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.