मुंबई : विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना घडली त्यावेळी विधानभवनात विविध समित्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भोजनासाठी आमदार सभागृहात दाखल झाले, त्याचवेळी आग लागल्याचं निदर्शनास आलं. आग लागल्यानंतर काही काळासाठी परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. खबरदारीचा उपाय म्हणून स्वागत कक्ष परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “ही आग स्वागत कक्षाच्या परिसरात लागली. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली होती. आगीचं स्वरूप लहान होतं आणि वेळेवर आग विझवण्यात आली आहे.” सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.