कल्याण : उद्धव सेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर यांची मुलगी प्राजक्ता ही पॅनल क्रमांक ४ मधून इच्छूक होती. मात्र पक्षाचे उप नेत्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेवक काटकर यांनी त्यांची मुलगी प्राजक्ता, पत्नी रोहिणी यांच्यासह शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशप्रसंगी का’ग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सलीम काजी यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
शिंदे सेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या उपस्थितीत मोहने शाखेत हा प्रवेश पार पडला. माजी नगरसेवक काटकर यांच्यासह त्यांची मुलगी प्राजक्ता यांनी आरोप केला की, उद्धव सेनेकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी त्यांची उमेदवारी कापली. उमेदवारी हवी असल्यास पैसे द्यावे लागतील. आम्ही पैसे देण्यासही तयार होतो. मागच्या निवडणूकीतही सर्व सिटिंग नगरसेवका उमेदवारी दिली गेली. केवळ काटकर यांची उमेदवारी कापली होती. आत्ता पुन्हा काटकर मुलीची उमेदवारी साळवी यांनी कापली आहे. पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विषयी आम्हाला काही एक तक्रार नाही. साळवी यांच्यामुळे उद्धव सेना सोडली असल्याचे काटकर कुटुंबियांनी सांगितले.
दरम्यान यासंदर्भात उद्धव सेनेचे उपनेते साळवी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, उमेदवारी देताना सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे काटकर कुटुंबियांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरु होऊन उमेदवारी अर्ज भरले गेले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली तर शिंदे सेनेत इनकमिंग सुरुच आहे.