दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही’ – राज ठाकरे

0

मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईवर जगभरातुन प्रतिक्रिया येत आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा मी पहिले ट्वीट करत म्हंटल होत की, या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढीला हे लक्षात राहिले पाहिजे अशी कारवाई केली पाहिजे. परंतु, दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही.जेव्हा अमेरिकेत दोन ट्विन टॉवर पाडले. पेंगागॉनवर त्यांनी हल्ला केला, म्हणून अमेरिकेने जाऊन काही युद्ध केले नाही. त्यांनी ते दहशतवादी ठार मारले, अशी पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुम्ही दुसऱ्या देशात युद्धजन्य परिस्थिती आणायची आणि ते काय मॉक ड्रील करायचे, सायरन वाजवणार वगैरे.. मुळात ही गोष्ट का घडली? हे पण आपण लक्षात घेण्यासारखे आहे. थोडे अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणे गरजेचे आहे. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला तुम्ही आणखी काय बरबाद करणार, अशी विचारणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.

ज्या दहशतवाद्यांनी तो हल्ला केला, ते दहशतवादी तुम्हाला अजून सापडलेले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती. हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून यांना शोधून काढणे हे गरजेचे आहे. एअर स्ट्राइक करून, लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवून, युद्ध करणे हा काय त्याला पर्याय होऊ शकत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ऑपरेशन सिंदूर हे नाव दिल्याने भावनांचा विषय काही येत नाही. प्रश्न हा आहे की, तुम्ही नेमकी काय पावले उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम झाले, ते करायची काही आवश्यकता नव्हती, असे राज ठाकरे म्हणाले.

दुसरे गोष्ट म्हणजे सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायलाच हव्यात. ज्या वेळेला हा सगळा प्रकार झाला, तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते. तो दौरा अर्धवट सोडून परत आले आणि बिहारला प्रचाराला गेले. तिथे जायची गरज होती, असे वाटत नाही. त्यानंतर ते केरळला गेले. तिथे अदानींच्या पोर्टचे उद्घाटन केले. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीसाठी व्हेव कार्यक्रम केला, तिथे ते आले. इतकी गंभीर परिस्थिती आहे, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. त्यानंतर ते मॉक ड्रील करायचे, एअर स्ट्राइक करायचे, हे या गोष्टींवर उत्तर नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे, त्यांना शोधून काढणे, त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. देशभरात मॉक ड्रील करण्यापेक्षा देशभरात कोम्बिंग ऑपरेशन करायला पाहिजे. आपल्या देशातील पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मुंबई महाराष्ट्रातील पोलीस दलाची प्रशंसा करेन की, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आज आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जात आहोत. ही योग्य गोष्ट नाही. आज नाक्या-नाक्यावर ड्रग्ज मिळत आहेत, हे ड्रग्ज येतात कुठून, का येत आहेत, या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणे गरजेचे आहे. लहान मुले ड्रग्ज घ्यायला लागली आहेत. शाळा, महाविद्यालयामध्ये ड्रग्ज पोहोचतात कसे, हे प्रश्न आत्ता महत्त्वाचे आहेत. युद्ध हे काय याचे उत्तर नाही, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech