मुंबई : भाजपा-महायुतीने गेल्या काही वर्षात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हातच घातला नाही, तर ते प्रश्न सुटू शकतात, असा आत्मविश्वास मुंबईकरांमध्ये तयार केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईला फिंटेक्स सिटी बनवणार तसेच धारावीमध्ये जागतिक दर्जाची घरे देणार आहोत. त्यामुळे इतर कुणीही वचननामा दिला तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये असलेल्या अंतरामुळे वचननामा पूर्ण करू. तसेच पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जाऊ तेव्हा वचननाम्यावर आधारीत ॲक्शन टेकन रिपोर्ट फॅक्टशीट म्हणून मांडू. काय केलं होतं हे सांगू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
महायुती-भाजपाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतले बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यामुक्त मुंबई करणार, मुंबईतील सर्व ठेकेदाराचे व्हेरीफिकेशन करणार, पालिकेत मराठी भाषा विभाग स्थापन करणार, मराठी तरुणासाठी शिक्षण, रोजगार आणि उद्योगासाठी नवे धोरण राबवणार, मुंबई पालिकेच्या रुग्णालयांच्या सलग्न हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारणार, हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारणार, भ्रष्टाचार मुक्त पालिका करण्यासाठी ए आय तंत्रज्ञान आणणार. डीम कनव्हेन्सचे विषय सोडले. जागा फ्रि होल्ड करण्याचं काम केलं. हाईटच्या समस्या सोडवल्या. भविष्यात याला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईत राहणारा मराठी माणूस काहीही झालं तरी मुंबई सोडून जाणार नाही. मुंबईतच त्याला घरं देऊ हा संकल्प घेतला आहे. बीडीडीचाळ पत्राचाळ, विशाल सह्याद्रीत हे करून दाखवलं आहे. काही लोकं केवळ मराठी माणसाच्या घराबद्दल बोलत असतात. आम्ही वचन करणारे आहेत. म्हाडाचे लेआऊट्समध्ये रिडेव्हल्पमेंट करताना अधिकची जागा देत आहोत. त्यात पारदर्शकता आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
धारावीचा विकास डीआरपी करणार आहे. शासन भागीदार आहे. धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला कमीत कमी साडे तीनशे स्क्वेअर फुटाचे घर देणार आहे. धारावीतील लघु उद्योग व्यवसायांना चांगल्या पद्धतीने इको सिस्टीम करून देणार आहे. धारावीतील अपात्रांना हायकोर्टाचे आदेश न मोडताना मार्ग काढून त्यांना घरं देणार आहोत. महापालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तो निर्णय बदलला होता. आम्ही पुन्हा निर्णय घेतला. महापालिकेतील सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर देणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून शाळा आधुनिक करणार आहोत. कौशल्य युक्त करणार आहोत. महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुलांना मराठी नीट शिकता आलं पाहिजे त्यासाठी मराठी लँग्वेज लॅब करणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात महापालिकेने यापूर्वी चांगलं काम केलं. आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या केल्या. त्या अधिक चांगल्या करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.