मुंबई : मरीन ड्राइव्ह येथे एक हृदयद्रावक घटना घडली. एका ४३ वर्षीय महिलेने भरतीच्या वेळी समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिसरात अनेक लोक उपस्थित असताना कोणीही मदतीसाठी पुढे न आल्याने ही घटना अधिकच व्यथित करणारी ठरली. मात्र, वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई सुरेश भिकाजी गोसावी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली आणि महिलेला वाचवण्याचा शूर प्रयत्न केला
समुद्र प्रचंड खवळलेला असताना संबंधित महिलेनं अचानक समुद्रात उडी घेतली. गर्दीने पाहात राहणे पसंत केले, मात्र पोलीस शिपाई गोसावी यांनी समुद्रात उडी घेतली. त्यांच्या सहकाऱ्याच्या मदतीने त्यांनी महिलेला किनाऱ्यावर आणले आणि तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने एकीकडे समाजातील संवेदनशून्यता अधोरेखित केली असताना, पोलीस शिपाई गोसावी यांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. ह्या कृत्याबद्दल त्यांना ५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे.