यवतमाळ : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मागील सहा वर्षात राज्यात प्रशासनाने ५ हजार ४२१ बालविवाह रोखले असून ४०१ प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. २०२४ या वर्षात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बालविकास विभागाने ४७ बालविवाह थांबवले आहेत. यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची व सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. त्या अनुषंगाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाही यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहेत. लविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणारे व्यक्ती, धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे व्यावसायिक, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे सेवा देताना मुलगी १८ वर्षे पुर्ण व मुलगा २१ वर्ष पूर्ण असण्याची खात्री करण्यात यावी. नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन या टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा ११२ यावर माहिती द्यावी, नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.