जळगाव : जळगावात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ केली असून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ दोन संशयित व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला. रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी सचिन दरबारसिंग राजपूत (३४, रा. रामेश्वर कॉलनी) आणि सचिन संजय गोसावी (२३, रा. वाघ नगर, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा, दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ डीयू ७८०८) असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.