जळगाव : एकीकडे राज्यात शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु असून यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षही एकत्र येणार असल्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. यावरून शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहे. त्यांचा दोघांमध्ये ‘आय लव यू’ आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान यावेळी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. हिंदी सक्ती वरून एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरूनच मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे तुझ्या छाताड्यावर आहेत. तू अजून शुद्धीवर आला नाही का सोन्या.. अशी टीका गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
दरम्यान, हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असून याला आमचा विरोध नाही, मराठी ही आमची भाषा आहे. हिंदी भाषेबाबत सामूहिक निर्णय झाला पाहिजे. मला नाही वाटत की याबाबत कोणाचा विरोध असेल, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जागा वाटपावर चर्चा कशी होणार, शिवसेना पक्ष वेगळी भूमिका घेणार का? यावर बोलताना, मंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेच्या जागा वाटपाबाबत शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, त्या निर्णयानुसार काम करू. जागा वाटपाबाबत राज्याची पॉलिसी महायुती आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवेल. एखादा जिल्हाध्यक्ष बोलल्याने काही होत नाही.