आणीबाणीत सहभागी असलेल्या १७५ जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव
जळगाव : लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. देशात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १७५ लोकशाही सेनानींचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलते होते.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी व अजित मेंडकी, उदय भालेराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तुमच्या संघर्षामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली, देश जगभर लोकशाही राष्ट्र म्हणून आपली छटा उमटवत आहे. आता देशात सर्व सामान्यांच्या कल्याणापासून ते देशात विविध पायाभूत सोयसुविधा उभा करून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडवीत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ. सुरेश भोळे यांनीही आणीबाणीच्या काळातील सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख करून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी व अजित मेंडकी, उदय भालेराव यांनी आपल्या मनोगतातून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील १७५ व्यक्ती आणीबाणीच्या लढ्यात होती. यातील हयात असणाऱ्या अनेकांनी मंचावर येऊन गौरव स्विकारला, दिवंगत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी हा गौरव स्विकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. त्यात त्यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.