रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादीची ६१ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्याला रत्नागिरी पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने अटक केली. या गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीला मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी फिर्यादीचे सीम कार्ड बंद होणार आहे, अशी भीती घालत त्यानिमित्ताने पोलिसांकडे तक्रारीकरिता कॉल फॉर्वर्ड करीत असल्याचा बहाणा करण्यात आला. यावेळी आरोपीसोबतच्या दुसऱ्या व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले आहे आणि या खात्यामधून दोन कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घातली.
यावेळी फिर्यादीला त्या बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास भाग पाडत ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे रत्नागिरीच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासात फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी राजीव विश्वनाथ तिवारी (वय ४७, रा. ७८, नाका, शिवनगर कॉलनी, पहाडगंज, फैजाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. दिल्ली) येथे असल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली येथे तपास पथक पाठवून कोणत्याही प्रकारचे मोबाइल लोकेशन प्राप्त नसताना स्थानिक बातमीदार तयार करून त्याआधारे आरोपीला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
गुन्ह्याचा तपास आणि आरोपीला अटक करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, रामचंद्र वडार, रोहन कदम, रामदास पिसे, संदीप नाईक, रमिज शेख यांनी केली. कोणीही मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, नॅशनल सिक्युरिटी विभाग, इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमच्या सिम कार्डचा गैरवापर झाला असून त्याकरिता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल तसेच अकाऊंट व्हेरिफिकेशनकरिता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक, बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका व अशा धमक्यांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.