रत्नागिरी : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण वेगळे नाते आहे, ते गावागावातून कधीच तुटू शकत नाही, असे प्रतिपादन कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी केले. चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात झालेल्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, गावातील लोकांना धनुष्यबाण माहीत आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. यामुळे लोक स्वतःहून शिवसेनेत येत आहेत. तेव्हा लोकांची कामे झाली पाहिजेत, या दृष्टीने काम करा आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे. तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. तुम्ही कधीही मला हाक मारा, आपण तुमच्यासोबत सदैव उभा राहू, अशी ग्वाही राणे यांनी यावेळी दिली. यावेळी चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी राणे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.