सांगली : राज्यात कार्यकाळ संपुष्टात येऊनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रतिक्षित आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना त्याचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने तयारी देखील सुरू आहे. दरम्यान आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तयार राहा, असे आदेश दिले आहेत. तसेच जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणावर निधी देऊ, असे आश्वासन देखील दिले आहे. ते सांगलीत भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या ताब्यात असल्या की काम चांगलं होतं, नाहीतर विकासाला खीळ बसते. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागा, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका एकत्र होतील किंवा ५-६ दिवसांचं अंतर असेल. त्यानंतर १५ दिवसांनी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या. न्यायालयाच्या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.