प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये दडला आहे एक कलावंत : अशोक सराफ

0

* आंतरविभागीय खात्यांतर्गत ५३ व्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
* ‘कायप्पाचा पाडा’ ठरले सर्वोत्कृष्ट नाटक

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका ही खूप मोठी कर्तव्यदक्ष आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेत जितके हुशार, कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत, तितकेच हरहुन्नरी कलाकारही या कर्मचाऱ्यांमध्ये दडलेले आहेत. रोजचे काम सांभाळून आपल्यातील कला सादर करणे हे खूप मोठे आव्हान आहे. तुमच्यातील कलाकार असाच जिवंत ठेवा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा, असे प्रतिपादन पद्मश्री तथा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित ५३ व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा सन २०२४ – २५ चा पारितोषिक वितरण समारंभ पद्मश्री तथा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या हस्ते काल (३० मे) सायंकाळी विलेपार्ले येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, माजी उप आयुक्त किशोर क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ अभिनेते  अशोक सराफ म्हणाले की, मी अनेक कार्यक्रमांना जातो. वेगवेगळी स्नेहसंमेलने पाहतो. परंतु इतका रेखीव आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मी याआधी पाहिला नाही. या प्रत्येक कलाकाराच्या कृती मागे खूप उत्साह दिसून आला. कर्तव्याची जाणीव असलेला प्रत्येक कर्मचारी जितका आपल्या कामाला न्याय देतो, तितकाच त्याने आज या रंगमंचावर आपल्या कलेला देखील न्याय दिला, असे सराफ यांनी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, महानगरपालिकेत गुणी आणि कलासक्त कर्मचारी आहेत. या सर्व कलावंत कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेचे सतत सहकार्य असते. सर्व कर्मचारी खूप गुणी आहेत. नृत्याची उत्तम जाण आहे. प्रशासन देखील त्यांना पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे उत्कृष्ट नाटके दरवर्षी सादर होतात. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेसाठी देखील प्रवेशिका पाठवल्या जातात. महानगरपालिका एक विस्तृत कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येकाच्या प्रतिभेचा गौरव केला जातो, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांनी प्रास्ताविकातून कामगार विभागाच्या वतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार खात्याच्या वतीने ५३ वी आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा ही ८ एप्रिल ते १६ मे या कालावधीत मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या नाट्यस्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रेमानंद गज्वी, प्रकाश बाडकर, श्रीमती शकुंतला नरे यांनी कामकाज पाहिले.

यंदाच्या नाट्य स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कायप्पाचा पाडा’ या नाटकाला मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर श्रीमती मानसी जोशी यांना याच नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आणि राजा शिंगाडे यांना ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. याशिवाय विविध गटात ३० उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech