गुरुजी, देवरसांनंतर भागवतांनी भूषवले सर्वाधिक काळ सरसंघचालकपद

0

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मार्च २००९ मध्ये सरसंघचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्यांनी सलग १६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे गोलवळकर गुरूजी आणि ‘बाळासाहेब’ देवरस यांच्यानंतर सर्वाधिक काळ सरसंघचालकपद भूषवणारे म्हणून डॉ. भागवत यांचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी नागपूरच्या शुक्रवारी परिसरातील आपल्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. विजयादशमीच्या दिवशी डॉ. हेडगेवार यांच्यासह विश्वनाथ केळकर, भाऊजी कावरे, ल.वा. परांजपे, रघुनाथराव बांडे भय्याजी दाणी, बापू भेदी, अण्णा वैद्य, कृष्णराव मोहरील, नरहर पालेकर, दादाराव परमार्थ, अण्णाजी गायकवाड, देवघरे, बाबूराव तेलंग,तात्या तेलंग,बाळासाहेब आठल्ये, बाळाजी हुद्दार आणि अण्णा सोहनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रोपटे रोवले होते.

सरसंघचालकांचे कालावधी
संघाच्या स्थापनेपासून १९२५ ते १९४० डॉ. हेडगेवार यांच्याकडे सरसंघचालक पद होते. त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गुरूजी यांनी १९४० ते १९७३ अशी तब्बल ३३ वर्षे या पदाची धुरा सांभाळली. गुरूजींच्या खालोखाल मधुकर उपाख्य बाळासाहेब देवरस यांनी १९७३ ते १९९४ असे २१ वर्षे सरसंघचालकपद भूषविले त्यानंतर रज्जू भैय्या १९९४ ते २००० (६ वर्षे) आणि के.एस. सुदर्शन २००० ते २००९ (९ वर्षे) यांनी सरसंघचालक पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २००९ पासून आजतागायत गेली १६ वर्षे डॉ. मोहन भागवत यांच्याकडे सरसंघचालक पदाची जबाबदारी आहे. यापूर्वी प्रदीर्घ सरसंघचालकपदी राहणाऱ्यांमध्ये गोळवलकर गुरूजी (३३ वर्षे) आणि बाळासाहेब देवरस (२१ वर्षे) यांची नावे येतात. या क्रमवारीत गुरुजी आणि देवरस यांच्यानंतर डॉ. मोहन भागवत (१६ वर्षे) हे सर्वाधिक काळ पदावर राहणारे सरसंघचालक ठरले आहेत.

डॉ. भागवत यांनी नुकतेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. डॉ. भागवत यांच्या कार्यकाळात संघाने अनेक पातळ्यांवर संवादकेंद्रित भूमिका स्वीकारली. त्यांनी विविध समाजघटकांशी खुलेपणाने संवाद साधला, शहरी युवकांपासून ते बुद्धिजीवी वर्गाशी थेट संवाद निर्माण केला. संघाच्या प्रतिमेत लवचिकता आणि समकालीनतेचे दर्शन त्यांच्या नेतृत्वामुळे घडले, असे मानले जाते.त्यांच्या कार्यकाळात संघाचा प्रभाव राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वाढत गेला. विशेषतः भाजपप्रणीत सरकारच्या काळात संघाचा सल्लागार प्रभाव अधिक दृश्यमान झाला. मात्र, अनेकदा त्यांनी स्पष्टपणे संघ आणि सरकार यांच्यातील भेद अधोरेखित केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech