शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घ्या – प्रतापराव जाधव

0

बुलढाणा : विकसित कृषी संकल्प अभियान शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामधील संवाद अधिक बळकट करण्याकरिता मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठ आणि कृषी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले विविध संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक जलद गतीने पोहोचविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन संशोधनाला नवीन दिशा मिळणार आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन आयुष्य राज्यमंत्री व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियानाच्या आयोजित कार्यक्रमात प्रतापराव जाधव बोलत होते.

राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाची माहिती देत शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामधील संवाद अधिक बळकट करण्याकरिता हे अभियान असल्याचे सांगितले. शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. मृदा परीक्षण, मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन, बियाण्यांची निवड, खतांचा योग्य वापर, लागवड पद्धती, शेतीमधील नवीन तंत्रज्ञान जसे ड्रोनचा फवारणीसाठी वापर, रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी जैविक कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर शेतीमध्ये करावा, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रात दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पिकांचे प्रात्यक्षिक लावले जाते. या प्रात्यक्षिकामध्ये खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पिकांच्या विविध जातींची लागवड करून शेतकऱ्यांना माहिती मिळावी, असा त्याचा उद्देश असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कृषी विज्ञान केंद्राला खरीप आणि रब्बी हंगामामध्ये भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वानांची माहिती आवर्जून घ्यावी आणि या केंद्राकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान समजून घेऊन कमी खर्चामध्ये अधिक फायद्याची, नफ्याची शेती कशी करता येईल यांचे तंत्र शास्त्रज्ञांकडून समजावून घ्यावे, असे आवाहनही जाधव यांनी केले.

यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांनी अवगत करून घ्यावे. जेणेकरून कमी खर्चामध्ये उत्तम उत्पादन देणारी शेती करता येईल आणि नफ्याची शेती शेतकरी करू शकतील. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कृषी महाविद्यालय, बुलढाणा, कृषी विभाग आणि आत्मा, बुलढाणा यांच्या माध्यमातून दिनांक २९ मे २०२५ पासून सुरू असलेल्या या अभियानामध्ये शेतकरी सक्रियतेने सहभाग घेत असून शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती उत्स्फुर्तेने घेत असल्याबाबत सांगितले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्राच्या ठिकाणी सातत्याने भेट देऊन नवीन तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, जेणेकरून शेती करणे फायद्याचे होईल, असेही त्यांनी सांगितले. कृषी सखी वंदना टेकाळे यांनी शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनावर मूल्यवर्धन करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास आपल्या कुटुंबाला एक नवीन आर्थिक धोरण देऊन शेती ही फायद्याची करता येऊ शकते, बाबत माहिती देत त्या स्वतः करत असलेल्या विविध प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech