अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम – आ. रोहित पवार

0

मुंबई : “हा अपघात आहे की घातपात, हा प्रश्न कायम राहतोय आणि सध्या घातपाताच्या दिशेने तपास जाताना दिसतो,” असे ठाम मत रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. २७ तारखेला कोण भेटायला आले, कोणाचे फोन आले, सायंकाळी ६.५० ते ७.०५ दरम्यान फोनवर नेमके काय बोलणे झाले, यासारख्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. रोहित पवार म्हणाले की, मुंबईहून बारामतीकडे जातानाच विमानाचे फ्यूल टँक पूर्ण भरले होते. प्रत्यक्षात बारामतीला दादांना सोडल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर मग हैदराबादला जाऊन इंधन भरता आले असते. महाराष्ट्रात इंधन स्वस्त म्हणून भरले असेल तर गुजरातमध्ये त्याहूनही स्वस्त आहे, मग एवढे फ्यूल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचे कारण काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

अपघातस्थळी विमान रनवेवर नव्हे तर कडक पृष्ठभागावर बाजूला कोसळल्याने जोराचा धक्का बसला, असे सांगत त्यांनी स्फोटाच्या कारणांबाबत शंका व्यक्त केल्या. विमानात अतिरिक्त फ्यूल टँक होते आणि टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक तसेच त्याजवळ ब्लॅक बॉक्स असतो, अशी माहिती त्यांनी दिली. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सरकारी स्पष्टीकरण संशयास्पद असल्याचे सांगत, तज्ज्ञांच्या मते ११०० अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स तासभर टिकू शकतो, असे ते म्हणाले.

देखभाल आणि नियमभंगाच्या मुद्द्यांवरही त्यांनी बोट ठेवले. अकाउंटेबल मॅनेजरचे नाव साईटवरून हटवण्यात आले, त्याची चौकशी झाली का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी डीजीसीएला कागदोपत्री खेळी न करण्याचा इशारा दिला. विमा रकमेबाबत बोलताना, विमानाची बाजारातील किंमत कमी असताना मोठ्या रकमेचा विमा काढण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पायलट सुमित कपूर यांच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल केले गेले का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत रोहित पवार यांनी “१००–२०० कोटींसाठी कंपनी वाचवू नका, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही,” असा स्पष्ट इशाराही दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech