एग्झिट-पोल घेण्यासही हायकोर्टाने केली मनाई
नागपूर : राज्यातील सर्व २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी हा निर्णय दिलाय. त्यामुळे राज्यात निवडणूक आचारसंहिता आगामी २० डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. तसेच यादरम्यान एग्झिट पोल जाहीर करण्यासही न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने मनाई केली आहे.
राज्यातील सर्व पालिका-नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात याचिका दाखल असलेल्या ठिकाणी आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यानुसार, या संबंधित पालिका व प्रभागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते. या दोन वेगवेगळ्या दिवशी निकाल जाहीर करण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरुद्ध वर्धा येथील उमेश कामडी, सचिन चुटे यांच्यासह काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवर सुनावणी झाल्यावर न्यायालयाने हा एकसूत्री निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या या आदेशामुळे निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकात बदल झाला आहे. राज्यात आता आगामी २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.