( अनंत नलावडे)
मुंबई – सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात झाली. त्याचवेळी महायुती सरकार मधील सहभागी दुसरा मोठा पक्ष शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची एक विशेष बैठकही पार पडली. या बैठकीत राज्यातले व देशभरातून आलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित आमदार,खासदार, व नेत्यांनी आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख व्हावे असा ठराव मंजूर केला खरा पण त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाम नकार देत सध्यातरी मी आहे तीच मुख्य नेतेपदाची जबाबदारी स्वीकारतो, असे सांगितल्याने उपस्थित सर्व महिला व पुरुष पदाधिकारी व नेत्यांच्या भुवया उंचावल्या हे विशेष….
इतकी मोठी बैठक होत असताना स्वतः मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत असतानाही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा बैठकीत उपस्थिती लावल्याने सर्वच नेते, पदाधिकारी बुचकळ्यात पडले.मात्र नेमक्या कारणांचा धांडोळा घेतला असता अशी माहिती मिळाली की, सध्या उपमुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेत त्यांचे सुपुत्र खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांना स्थिरस्तावर करायचे आहे.आणि बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित कारणे जाणून घेतली असता ते उपस्थित पदाधिकारी व नेत्यांवर आपल्यामुळे दबाव येईल, अशी त्यांची धारणा झाल्याने त्यांनी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा उपस्थिती लावली,अशी माहिती पक्षाच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या खास वर्तुळातील सूत्रांनी दिली.
यासंदर्भात, प्रत्यक्ष एका नेत्याकडून फोन वरून संपर्क साधला असता, या नेत्याने सुरुवातीलाच मोठे हास्य केले. तर दुसऱ्याच क्षणी,” अहो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली हे सांगत असताना त्यांनी स्वतःला सावरले…. पण सुरुवातीला त्याचे मोठे हास्य बरेच काही सांगून गेले.
आजच्या बैठकीत जे ठराव मंजूर करण्यात आले त्यात अती महत्त्वाचा ठराव होता शिवसेनेत खास स्वतंत्र”शिवकोष निर्मिती”. व त्यापाठोपाठ राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सर्वसुविधा युक्त शिवसेनेची प्रशस्त कार्यालये….. आता खरा प्रश्न इथूनच सुरू होतो तो म्हणजे यासाठी मोठे आर्थिक पाठबळ उभारण्याची आवश्यकता….. आता खुद्द पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वात मोठे मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल नगरविकास खाते आहे. हे इतके महत्वाचे आहे की, याच खात्यांतर्गत राज्यातील प्रमुख शहरातील मोठे नामवंत बिल्डर येतात. तर त्यांच्याच कडे असलेल्या अन्य दोन गृहनिर्माण व सार्वजनिक उपक्रम या दोन विभागातही धारावी पुनर्विकास व सध्या गाजत असलेला वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग….. तर त्यांचे अन्य एक विश्वासू मंत्री म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट….. हे खाते पण काय कमी नाही…… पण एकंदरीत आज जी “शिवकोष निर्मिती” ची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली त्यासाठी आगामी काळात पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी आगामी किमान दहा वर्षाचा विचार करता ३६ जिल्ह्यातील पक्ष कार्यालयांचे नियमित कामकाज, दहा वर्षात होणाऱ्या निवडणुकांचा खर्च,पदाधिकाऱ्यांना आर्थिक पाठबळ, आदी सर्व विचारात घेता शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्याला त्याचे दर महिन्याचे निधी जमा करण्याचे टार्गेट ठरवून देण्यात आल्याचे अनौपचारिकपणे सांगण्यात आले. बरं यासंदर्भात त्यांच्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते व माजी मंत्री, तसेच मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही याला दुजोरा दिला हे विशेष………
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांचे खास विश्वासू खा.नरेश म्हस्के म्हणाले की, शिवसेना पक्ष राष्ट्रीय स्तरावर वाढतोय. अलीकडेच मध्य प्रदेशमधील काही आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. कर्नाटक, राजस्थान अशा राज्यांमधील विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.त्यामुळे पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात यावे. काहींच म्हणणे होतं की पक्षप्रमुख म्हणून हा निर्णय घेण्यात यावा.परंतु एकनाथ शिंदे यांनी सध्या तरी मुख्य नेता म्हणूनच काम करणार, पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वाढवायचा आहे, पद महत्वाचे नाही तर काम महत्वाचे आहे, असं सांगून शिंदे यांनी तूर्त या विषयावर पडदा टाकला असल्याचेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. तर पक्षाचे अन्य एक ज्येष्ठ नेते माजी खा.आनंदराव अडसूळ म्हणाले की, कार्यकारिणीची पुढील बैठक दिल्लीत बोलविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.
आता खरी गंमत पाहा. आज झालेल्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर ठराव…. त्यात प्रामुख्याने;-
१) पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबतचा ठराव मंजुर करण्यात आला.
२)पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक समिती जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंदर्भातील सर्व अधिकार शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
३) पक्ष संघटनेतील पदनाम बदलण्याचा ठराव, याबाबत अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
४) सनदी लेखापाल आणि अंतर्गत हिशेब तपासणीस यांची नेमणूक करण्यासंदर्भात…… आणि सर्वात शेवटी जो अतिमहत्त्वाचा ठराव आहे तो म्हणजे शिवकोष निर्मितीचा ठराव, प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचे कार्यालय उभारणार.
पण यात एक बाब मात्र खटकण्याजोगी ती म्हणजे या बैठकीची अधिकृत प्रेस नोट रात्री उशिरा पर्यंत निघेल असे सांगण्यात आले. मग प्रश्न असा उभा राहतो की एखाद्या नेत्याच्या पत्रकार परिषदेची माहिती एका क्षणात माध्यमांवर टाकणारे शिवसेनेचे हौशी माध्यम अधिकारी यांनी आताच इतकी गुप्तता का बाळगावी याची…… मात्र त्यांनी जी गुप्तता बाळगली त्याची अवघ्या वृत्तपत्र व प्रसार माध्यमांत एकच अफवांचे पीक आले की खुद्द मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बैठकीत उपस्थित नव्हते.
……………….