महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीत अनेक केंद्रांवर ईव्हीएम बंद; मतदार त्रस्त

0

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सकाळपासून राज्यभरात मतदानास सुरुवात झाली असून २६४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सज्ज करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात होताच मतदारांनी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्यामुळे सकाळच्या सत्रात अनेक केंद्रांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र काही ठिकाणी प्रशासनाच्या सावळ्या कारभारामुळे त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेतील नेताजी प्राशाळा येथे मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने अर्ध्या तासापासून मतदान पूर्णपणे ठप्प झाले. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मशीन पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची गैरसोय वाढली आहे. मोहोळ शहरातील आठवडी बाजार मतदान केंद्रावरही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून मशीन बंद पडल्याने माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मशीनवर केवळ भाजप चिन्हाचेच बटन दाबले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटे आरोप केल्याचा पलटवार केला. प्रभाग क्रमांक २ मधील बूथ क्रमांक १ वरची मशीन तब्बल एका तासापासून बंद असून उमेदवारांनी स्वतः केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथेही प्रभाग क्रमांक ८ मधील दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बिघडल्याने ३५ मिनिटांपासून मतदान ठप्प झाले आहे. मतदारांची लांबलचक रांग वाढत असून अद्याप मतदान पुनर्प्रारंभ झालं नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील खेंड मतदान केंद्रावरही दोन वेळा मशीन बंद पडल्याने मतदार खोळंबले असून प्रशासनाकडून मशीन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषद मुला–मुलींच्या उर्दू शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ९ मधील २ नंबर खोलीतील ईव्हीएम देखील अर्धा तासांपासून बंद पडल्याने सकाळच्या सत्रात मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांकडून मशीन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती पूर्ववत होण्याची मतदार प्रतीक्षा करत आहेत. राज्यातील अनेक प्रमुख केंद्रांवर सुरू असलेल्या या तांत्रिक बिघाडांमुळे मतदानाचा वेग मंदावला असून मतदारांमध्ये नाराजीचे भाव दिसत आहेत. निवडणुकांची मतमोजणी बुधवारी होणार असली तरी मतदानातील या अडथळ्यांमुळे प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech