पणजी : गोवा येथील नाइट क्लब बिर्क बाय रोमियो लेनवर बुलडोझर चालवून तो पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की इंटरपोलने नाइट क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लूथरा यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. गोवा पोलिसांनी दोघांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस काढण्यासाठी सीबीआयशी संपर्क साधला होता.
मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सीएम सावंत यांनी उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाला सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर नाइट क्लब पाडण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, “हा नाइट क्लब सरकारी जमिनीवर बेकायदा बांधण्यात आला आहे. तो मंगळवारपर्यंत पाडला जाईल. जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रसामग्री तयार ठेवली आहे.” गोवा पोलिसांनी सोमवारी सांगितले की सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा हे घटनेनंतर काही तासांतच थायलंडमधील फुकेटला पळून गेले. इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस एखाद्या व्यक्तीची ओळख, ठिकाण किंवा गुन्हेगारी तपासाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी जारी केली जाते.
गत रविवारी गोव्याच्या अर्पोरा गावातील ‘बिर्क बाय रोमियो लेन’ नाइट क्लबमध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. ज्या नाइट क्लबमध्ये आग लागली त्या इमारतीबाबत अनेक वर्षांपासून बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी केल्या जात होत्या. ज्या जमिनीवर हा नाइट क्लब उभारण्यात आला, त्या जमिनीचे मालक प्रदीप अमोनकर यांनी हा खुलासा केला.
अमोनकर यांनी सांगितले की त्यांनी १९९४ साली अर्पोरा गावात दोन प्लॉट घेतले होते आणि २००४ साली त्यांनी सुरिंदर कुमार खोसला यांच्यासोबत हे प्लॉट विकण्याचा करार केला. मात्र सहा महिन्यांनी हा करार रद्द झाला कारण खोसला पैसे देऊ शकले नाहीत. तरीदेखील खोसला यांनी त्या जमिनीवर नाइट क्लब बांधला, जो नंतर सौरभ आणि गौरव लूथरा यांनी ताब्यात घेतला. सध्या हे दोघेही ‘बिर्क बाय रोमियो लेन’ नाइट क्लबचे संचालन करत होते.
अमोनकर यांनी आरोप केला की या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य आरोपी सुरिंदर खोसला आहे. त्यांनी दावा केला की खोसला देशाबाहेर पळून जाऊ शकतो. दरम्यान, राज्य प्रशासनाने स्थानिक पंचायतींवर बेकायदेशीर बांधकामांना मंजुरी देण्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात सांगितले की नाइट क्लबला वीज, पाणी आणि इमारत दुरुस्तीचे एनओसी देण्यात आले होते. नाइट क्लबचा ट्रेड लायसन्स मार्च २०२४ मध्ये संपला होता, तरीदेखील नाइट क्लबचे संचालन सुरूच होते.