“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?” – जयराम रमेश

0

नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या सर्व घडामोडीवर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत. अशातच राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर काही प्रश्न उपस्थित केले होते. याला भाजपाने प्रत्युत्तर दिले असताना आता पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक महिला उलटला. परंतु, या कटात सामील असलेले दहशतवादी सापडले नसल्याबाबतचा थेट सवाल काँग्रेसने केंद्र सरकारला केला आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे, चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकला नसता, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली, जिन्ना यांना क्लीन चिट कोणी दिली, लालकृष्ण अडवाणींनी दिली. जिन्ना यांची प्रशंसा कोणी केली, जसवंत सिंह यांनी केली. लाहोर बस कोणी सुरू केला, अटल बिहारी वाजपेयींनी केला. नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, नरेंद्र मोदी गेले होते. आंबे कोणी पाठवले होते, शाल कोणी पाठवली होती, नरेंद्र मोदींनी पाठवली होती, असा पलटवार जयराम रमेश यांनी केला.

आम्ही इकडे कागदपत्रे तयार करत आहोत; पण, दहशतवादी तिथे फिरत आहेत. दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना अटक करा. दहशतवादी कुठे आहेत? एक महिना उलटणार आहे. त्यांच्याबद्दल माहिती कुठे आहे? २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी मारले गेले आणि एकाला अटक करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगाला माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेले शिष्टमंडळ हे केवळ पंतप्रधान मोदी यांचा यावरून लक्ष विचलित करण्याचा आणि जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावत नाही? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech