त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य शासनाचा नवा अध्यादेश !

0

अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तीन महिन्यांत शिफारसी देणार !

मुंबई : त्रिभाषा सूत्रासंदर्भात मनसे, ठाकरे गटासह विरोधकांकडून झालेल्या विरोधानंतर राज्यशासनाने आधीचे दोन अध्यादेश रद्द केले होते. त्यानंतर आता पुनर्विचारासाठी शिक्षण आणि अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, या संदर्भातील नवा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. नव्या अध्यादेशात उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे डॉ. माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे, तसेच नवी समिती तीन महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल, असे म्हटले आहे.

राज्यशासनाने त्रिभाषा सूत्र संदर्भातील पूर्वीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भात नवा शासन आदेश घोषित केला आहे. यामध्ये १६ एप्रिल आणि १७ जून २०२५ या दिवशी लागू झालेल्या शासन निर्णयांचा समावेश आहे. या अध्यादेशामध्ये मराठी माध्यमातील शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य केली होती, ज्यावर राज्यभर जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर हे अध्यादेश रहित करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

मराठी भाषेची समृद्धता : भारतात सध्याच्या घडीला जवळपास नऊ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. हिंदी, बांगलादेशानंतर देशात तिसरी सर्वाधिक बोलण्यात येणारी भाषा मराठी आहे. जगातील सर्वाधिक वापरात येणार्‍या भाषांमध्ये मराठी १५ व्या क्रमांकावर आहे. वऱ्हाडी, झाडीबोली, घाटावरची, घाटाखालची, अहिराणी, मालवणी, मराठवाडी, कोल्हापूरी, सातारी, संगमेश्वरी, पोवरी, कोहळी, वाडवळी, आगरी, चंदगडी, वारली, मावची, कोलामी, देहवाली, ढोर कोळी, गोसावी या अनेक बोलीभाषा मराठीत सामावलेल्या आहेत. जवळपास ६० बोलीभाषांनी मराठी भाषा समृद्ध आहे. मोडी लिपी हा एक प्रकार मराठीने जतन केलेला आहे. सलग आणि वेळ वाचवण्यासाठी ही लिखाण पद्धती तातडीचा संदेश पोहोचवण्यासाठी वापरात आली होती. हा संदेश शत्रू वाचू शकत नव्हता. आज मोडी लिपी संवर्धन आणि जतन करण्याचे काम शासन दरबारी सुरू आहे. मोडी हे मराठी भाषेचे वेगळे आणि सुंदर अंग आहे.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यात मराठी भाषिकांचा टक्का मोठा आहे. गोवामध्ये कोंकणी भाषेसह सरकार दरबारी मराठीला मान आहे. दमण-दीव आणि दादर-नागर हवेली सारख्या केंद्र शासित प्रदेशात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मध्य प्रदेशातील बालाघाट, सिवनी, छिंदवाडा, होशंगाबाद, बैतूल आणि बुऱ्हाणपूर पट्ट्यात मराठी भाषिक आहेत. २००१ मध्ये मुंबईत मराठी भाषिकांची संख्या ४५.२३ लाख आणि २०११ मध्ये हा आकडा ४४.०४ लाख होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech