नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार राजस्थानच्या बिकानेर येथे भेट दिली यावेळी झालेल्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना 3 प्रश्न विचारलेत. तसेच पंतप्रधानांचे रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरच उसळते अशा शब्दात त्यांनी मोदींवर विखारी टीका केली.
यासंदर्भातील ट्विटर संदेशात राहुल गांधी म्हणाले की, “मोदींनी दहशतवादाबाबत पाकिस्तानवर विश्वास का ठेवला?, डोनाल्ड ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन भारताच्या हितांचा त्याग का केला? मोदींचे रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उसळते”, अशा शब्दांत राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय, मोदींनी भारताच्या सन्मानाशी तडजोड केल्याचा आरोपही राहुल यांनी केलाय. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बिकानेरमध्ये सांगितले होते की, पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या गेल्या, पण त्या गोळ्यांनी १४० कोटी देशवासीयांच्या हृदयाला छेद दिला. देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने संकल्प केला होता की दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल. आमच्या बहिणींच्या केसांच्या विदाईतील सिंदूर नष्ट झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या सैन्याने असा चक्रव्यूह निर्माण केला की पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. २२ तारखेला पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, २२ मिनिटांत ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आपण सर्वांनी दहशतवाद्यांचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूपच वाढला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताने आपल्या संरक्षण प्रणाली आकाशतीरने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला. मात्र, त्यानंतर देशाच्या राजकारणात ठिणगी पडली असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.